Wednesday, July 1, 2009

घरातील सकारात्मक बदल

जेव्हा घर बांधलेले असते त्यावेळच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक सर्व बाबतीत फरक पडलेला असतो. अशा वेळी जर डिझायनरने काही असे बदल सुचवले तर गोंधळून जाऊ नका. त्यावर जरूर विचार करा.

राहत्या घरात किंवा फ्लॅटमध्ये जर आपल्याला अंतर्गत सजावट करायची असेल तर काही वेळा बांधकामामध्ये काही बदल करावे लागण्याची शक्‍यता असते. याचे कारण म्हणजे जेव्हा घर बांधलेले असते त्यावेळच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक सर्व बाबतीत फरक पडलेला असतो. अशा वेळी जर डिझायनरने काही असे बदल सुचवले तर गोंधळून जाऊ नका. त्यावर जरूर विचार करा. ते बदल अनिवार्य आणि चांगल्यासाठी असल्यास जरूर त्याचा अंगीकार करा. असे बदल म्हणजे एखादे टॉयलेट वाढविणे, बाल्कनी व खोलीमधील भिंत पाडून खोली मोठी करणे, हॉल आणि किचन यामधील भिंत पाडणे वगैरे.

या वेळी अंतर्गत संरचनेमध्ये बराच सकारात्मक बदल घडणार असतो. आतल्या जागेचा वापर सुधारणार असतो. बऱ्याच वेळा बाल्कनी अशा ठिकाणी असतात की जेथून कसलाही व्ह्यू नसतो. ना ती वाऱ्याची दिशा असते. कपडे वाळत घालण्यापलीकडे आणि अडगळ करण्यापलीकडे तिचा काही एक उपयोग असत नाही. जुने किचन कट्टे त्यावेळच्या पद्धतीनुसार बांधलेले असत. आता चांगल्या डिझाइनचे स्टेनलेस स्टीलचे सिंक, वॉटर प्युरिफायर, गॅस रेंज, कुकिंग रेंज, मायक्रोवेव्ह, चिमणी, फूड प्रोसेसर, किचन ट्रॉलीज आणि ड्रॉवर सिस्टीम अशा एक ना अनेक सुधारित गॅजेटस्‌ उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करायचा तर जुना कट्टा फोडून नवीन करणे फायद्याचे असते.

पूर्वी गॅस सिलिंडर कट्ट्याखाली ठेवले जाई. परंतु आता बाल्कनीत सिलिंडर बॅक करून पाईपने आत सर्व गॅजेटस्‌ना गॅस पुरवठा करणे सोयीचे होते. पूर्वीचे गिझर आता कालबाह्य झाले, किचन कट्ट्याखाली आणि वर कॅबिनेट करण्याची सोय झाल्यामुळे पूर्वीच्या कोठीखोलीचा उपयोग संपला किंवा कमी झाला. तिचा वापर दुसऱ्या कारणासाठी होऊ शकतो.
अत्याधुनिक वॉशिंग मशिनमुळे कपडे वाळण्याचा कालावधी अगदी कमी झाला। त्यातून बाथरूम, टॉयलेटमध्ये वरखाली करता येतील असे स्टॅंड उपलब्ध असल्यामुळे जागेचा चांगला उपयोग होऊ शकतो. असे अनेक अंतर्गत बदल केल्यामुळे आपल्या जागेचे नवीनच जागेत रूपांतर होते. मात्र, कोणतीही पाडापाडी करण्यापूर्वी नामांकित स्ट्रक्चरल इंजिनिअरला दाखवून खात्री केल्याशिवाय पुढील पाऊल उचलू नये. नाही तर ती विषाची परीक्षा ठरण्याची शक्यता आहे.

सौजान्य:ई-सकाळ

Saturday, June 27, 2009

वास्तु रचना

आजच्या काळात अचंबित करणाऱ्या अनेक वास्तुरचनांची निर्मिती होत आहे. देशभरातल्या अशा सुमारे तीस वास्तुरचना साकारणाऱ्या पंधरा वास्तुविशारदांनी आपल्या कल्पनेतून साकारलेले वास्तुकरिष्मे, त्यांची छायाचित्रे आणि या वास्तू साकारताना त्यांनी केलेला विचार, त्यांची मनोभूमिका "गोल्डन हॅंड्‌स-द पॉवर ऑफ आर्किटेक्‍चर' या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. त्याबद्दल...

"आसमंत' हा शब्दच अमर्याद व्यापकतेचं मूर्तिमंत स्वरूप आहे. निराकार निर्गुण ईश्‍वर हा या आसमंतांच्या चराचरात व्यापून उरला आहे; पण तरीही त्याची आळवणी करताना, त्याला भजताना किंवा त्याच्यापाशी प्रार्थना करताना आपल्याला कुठल्यातरी रूपात त्याला मनात साठवावं लागतं. स्वरूपाची मर्यादा घालावीच लागते आणि मग अशी मर्यादा घातली की, स्वतःच्या कल्पनांनुसार त्याला माणूस साकारतो, तेव्हाच त्याच्या नयनमनोहारी सौंदर्याचं दर्शन घडवणारं स्वरूप आपल्याला मनात साठवता येतं. हेच स्वरूप मग आपल्या मनाला शांती प्रदान करतं.

वास्तुविशारदाचं कामही काहीसं असंच असतं. मोकळ्या आसमंताला आकाराच्या मर्यादा घालून वास्तुविशारद वास्तू साकारतो. या वास्तूमध्ये वास करताना माणसांना मनाला उल्हासित वाटतं, विसावा मिळतो, नव्हे, तसा तो मिळावा, याच दृष्टीने त्या वास्तूची रचना केली जाते. ताजमहाल, बिबी का मकबरा, गोल घुमट, कुतुबमिनार, चारमिनार अशा काही जुन्या काळातल्या वास्तुरचना आश्‍चर्यजनक आणि प्रेक्षणीय आहेत; पण आपल्याला लाभलेल्या केवळ या समृद्ध कलावारशावर केवळ गतकाळच्या आठवणी जपण्यातच धन्यता मानेल तो माणूस कसला? हा कलावारसा आजच्या काळातल्या अनेक वास्तुविशारदांनी जपला आहे. त्यामुळे आजच्या काळातही अचंबित करणाऱ्या अनेक वास्तुरचनांची निर्मिती होत आहे. या वास्तू पाहताना आपली त्यांच्यावरची नजर हटत नाही. त्यांची भव्यता, विविधांगी आकार, तसंच ती तयार करताना कॉंक्रीटबरोबरच धातू, काचा आणि सभोवताली असलेली कारंजी, तळी तसंच सुयोग्य रंगसंगती साधणारी वृक्षराजी यांच्या माध्यमातून आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान आणि निसर्गाची घातलेली सांगड बघताना आपल्या डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटतं. अशा वास्तूंकडे पाहताना आपलं मन हरवून जातं.

देशभरातल्या अशा सुमारे तीस वास्तुरचना साकारणाऱ्या पंधरा वास्तुविशारदांनी आपल्या कल्पनेतून साकारलेले वास्तुकरिष्मे, त्यांची छायाचित्रं आणि या वास्तू साकारताना त्यांनी केलेला विचार, त्यांची मनोभूमिका "गोल्डन हॅंड्‌स-द पॉवर ऑफ आर्किटेक्‍चर' या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. "व्हाइट फ्लॅग मीडिया ऍण्ड कम्युनिकेशन्स' या कंपनीनं प्रकाशित केलेल्या या ३०० पानी पुस्तकाची किंमत साडेतीन हजार रुपये आहे.

मुंबईतल्या जे. डब्ल्यू. मॅरिएट या हॉटेलमध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुविशारद जेम्स लॉ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी काळानुसार वास्तुरचनांमध्ये कसा बदल होत गेला आणि आर्किटेक्‍चर ते सायबरटेक्‍चर असा आधुनिक वास्तुरचनाशास्त्राचा विकास कसा झाला, त्याचा आढावा घेतला. दुसऱ्या महायुद्धानंतर नागरीकरणानं झपाट्यानं वेग घेतला. त्याचबरोबर औद्योगिकीकरणातही वाढ झाली.

या बदलांमुळे वास्तूविषयक गरजा बदलत गेल्या. औद्योगिक इमारतींबरोबरच निवासी इमारतींच्या रचनांमध्येही बदल होत गेले. एकट्यादुकट्या घरांची जागा निवासी संकुलं घेऊ लागली. व्यावसायिक इमारती असोत वा निवासी इमारती, आपली वास्तू तयार झाल्यावर कशी दिसेल, याची उत्सुकता वास्तूंच्या मालकांना नेहमीच असते. ही त्यांची उत्सुकता शमवण्यासाठी आधी आराखडे, मग वास्तवाच्या जवळ जाणारी पर्सपेक्‍टिव्ह त्रिमिती चित्रं आली आणि त्यानंतर खऱ्याखुऱ्या इमारतींच्या छोट्या प्रतिकृती असलेली मॉडेल्स, वास्तुविशारद आपल्या अशिलांना दाखवू लागले. सध्याच्या काळात "ऑटोकॅड' आणि "थ्रीडी मॅक्‍स'सारख्या प्रगत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून "ड्राइव्ह इन व्ह्यू'द्वारे प्रस्तावित घरातल्या किंवा ऑफिसातल्या सगळ्या खोल्यांमधून फिरवून त्या कशा दिसतील, हे दाखवता येतं. "बर्डस्‌ आय व्ह्यू'द्वारे आकाशातून आपल्या इमारतीकडे पाहता येतं. अशा प्रकारे वास्तुरचनाशास्त्राचा विकास झाला आहे.

"इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल'चे अध्यक्ष डॉ. प्रेम जैन हे या सोहळ्याला प्रमुख वक्‍ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी "ग्रीन बिल्डिंग' या व्याखेमागील संकल्पना स्पष्ट केली. नेहमीच्या इमारतींच्या तुलनेत ग्रीन बिल्डिंगसाठी नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर अधिक कार्यक्षमतेनं केल्यामुळे त्या इमारतीमध्ये होणारा वीज, पाणी आणि इतर नैसर्गिक साधनांचा वापर कमी असतो. तसंच या इमारतींचा वापर करताना निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाणही नेहमीच्या इमारतींमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत कमी असतं. त्यामुळे अशा इमारतींमधलं वास्तव्य हे जास्त आरोग्यदायी असतं. ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर भर देण्याबरोबरच इमारतीमधल्या दरवाजे खिडक्‍याचं प्रमाण, त्यांचा आकार हा पुरेशी हवा खेळती ठेवण्याच्या दृष्टीने नियंत्रित केला जातो. त्यामुळे ऊर्जेची गरज कमी भासते.

या सोहळ्याप्रसंगी "गोल्डन हॅंड्‌स - द पॉवर ऑफ आर्किटेक्‍चर' या पुस्तकात ज्यांच्या वास्तूंचा समावेश आहे, अशा १५ वास्तुविशारदांचा कल्पतरू ग्रुपचे अध्यक्ष मोफतराज मुनॉट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वास्तुविशारदांमध्ये हाफिज कॉन्ट्रॅक्‍टर, लीलावती रुग्णालय साकारणारे शशी प्रभू, सिटी मॉल आणि नेहरू तारांगण साकारणारे प्रेमनाथ, ऑबेरॉय, मेरिएट अशी हॉटेलं उभारणारे शेखर पत्की अशा देशातल्या आघाडीच्या वास्तुविशारदांचा समावेश होता.

या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं प्रेस क्‍लब इथं आयोजलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ वास्तुविशारद प्रेमनाथ यांनी उपस्थितांच्या प्रश्‍नांना मनमोकळेपणानं उत्तरं दिली. वास्तुरचना करताना फॉर्मबरोबरच फंक्‍शनॅलिटीला, म्हणजे आकाराबरोबरच उपयोगितेलाही महत्त्व दिलं जातं, असं त्यांनी सांगितलं. अलीकडच्या काळात वास्तूंवर जुन्या भारतीय वास्तुतत्त्वांचा आणि वास्तुरचनाशास्त्राचा प्रभाव कमी होत चालला आहे का? तसंच पाश्‍चात्त्य वास्तुरचनेचा पगडा अधिक जाणवतो का? या प्रश्‍नाला उत्तर देताना प्रेमनाथ म्हणाले की, वास्तुरचना करीत असताना भारतीय किंवा पाश्‍चिमात्य वास्तुरचनाशास्त्रापैकी कुठल्याही एका पद्धतीचा जाणीवपूर्वक वापर केला जात नसून सामाजिक बदलांनुसार आणि अशिलांच्या मागणी आणि गरजांनुसार वास्तूची रचना करण्यावर अधिक भर असतो.
व्हाइट फ्लॅग या प्रकाशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्वज शाह यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यामागची संकल्पना स्पष्ट केली। कुठल्याही देशातल्या वास्तू या त्या देशाच्या कला आणि संस्कृतीची ओळख असतात. त्यामुळे भारतीय वास्तुविशारदांनी साकारलेल्या आश्‍चर्यपूर्ण वास्तू सर्वांपर्यंत पोहोचवणं; सर्वसामान्यांबरोबरच नवोदित वास्तुविशारदांना आणि अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असा ठेवा त्यांना मिळवून देणं हा या पुस्तकामागचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे वास्तुरचनाशास्त्राचे अभ्यासक, नवोदित वास्तुविशारद, कलाप्रेमी रसिक आणि सर्वसामान्यांसाठी हे पुस्तक उपयोगी ठरणार आहे.

सौजन्य:ई-सकाळ